जाण कायद्याची.. गृहनिर्माण संस्थेची नोंदणी
*सहकारसुत्र*
(जनहितार्थ)
*जाण कायद्याची.. गृहनिर्माण संस्थेची नोंदणी*
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नोंदणीची प्रक्रिया नोंदणीपूर्वी होणा-या पहिल्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजापासून सुरू होते. या सभेत संस्थेविषयी सविस्तर विचारविनिमय केला जातो. मुख्य प्रवर्तकाची सर्वानुमते निवड केली जाते. संस्थेच्या नावाने बँकेत खाते उघडण्याची, त्याचप्रमाणे संस्थेचे नाव काय असावे हेही ठराव मंजूर केले जातात. नोंदणीपूर्वीचे वाद टाळण्यासाठी निबंधकाशी सल्ला मसलत करणे फायदेशीर ठरते. अन्यथा अडथळे निर्माण होऊ शकतात.
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नोंदणीची प्रक्रिया नोंदणीपूर्वी होणा-या पहिल्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजापासून सुरू होते. या सभेत संस्थेविषयी सविस्तर विचारविनिमय करून मुख्य विषयांवर योग्य ठराव मंजूर करून निर्णय घेतले जातात. यावेळी निबंधकाची जबाबदारी मोठी असते. कारण, सभेत मुख्य प्रवर्तकाची निवड करणे, नियोजित संस्थेच्या नावाने बँकेत खाते उघडण्याची आणि संस्थेचे नाव राखून ठेवण्याची परवानगी मिळवण्यासाठी आवश्यक तो ठराव मंजूर केले आहेत की नाहीत, नियोजित संस्थेत एकूण किती सदनिका/गाळे आहेत, त्यापैकी किती गाळे/सदनिकाधारकांनी प्रत्यक्ष सभेत उपस्थिती दाखविली आणि ठरावास मंजुरी दिली, इत्यादी बाबी बारकाईने तपासून पाहणे, त्याची खात्री करणे आवश्यक आहे. याचाच अर्थ असा की, नियोजित संस्थेच्या सभासदांमध्ये गटबाजी असता कामा नये आणि म्हणूनच निबंधकाची भूमिका यावेळी फारच महत्त्वाची ठरते. सर्व बाबींचा सविस्तर विचार करूनच निबंधक संस्थेचे नाव राखून ठेवण्यास आणि त्या नावाने बँकेत खाते उघडण्यास निबंधक परवानगी देतो किंवा नाकारतो. म्हणून सभासदांनी योग्य विचार करूनच निर्णय घ्यायचे असतात.
गृहनिर्माण संस्थांचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते. एक म्हणजे भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था (फ्लॅट धारकांची संस्था) दुसरी आहे ती भाडेकरू मालकी गृहनिर्माण संस्था (फ्लॅट धारकांची संस्था) आणि तिसरी म्हणजे इतर गृहनिर्माण संस्था (गृहबांधणी, गृहतारण संस्था).
सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीचे निकष आणि आवश्यक असणारी कागदपत्रे संस्थांच्या प्रकारानुसार वेगवेगळे असतात आणि त्या-त्या वेळी त्यांची पूर्तता करणे बंधनकारक असते.
भाडेकरू सहभागीदार गृहनिर्माण संस्था नोंदणीकरिता महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे नियोजित जागेबाबतचा ७/१२चा उतारा किंवा मालमत्ता पत्रक जागा बिगरशेती असल्याबाबत सक्षम अधिका-याचा दाखल, सक्षम अधिका-याने मंजूर केलेल्या बांधकामाचा नकाशा, बांधकामास परवानगी दिल्याबाबतचे पत्र, बांधकाम पूर्ण केल्याचा दाखला, जागेचे कुलमुखत्यारपत्र, फ्लॅट खरेदीचा करारनामा नोंदणीकृत व आवश्यक तो मुद्रांक शुल्क भरलेला असावा. सभासदांची यादी, संस्थेची योजना, नाव आरक्षणाबाबतचा अर्ज, संस्था नोंदणीबाबतचा अर्ज, सभासदांचे हिशोब पत्रक, संस्थेचे मुख्य प्रवर्तकांनी रु. १०० च्या स्टँप पेपरवर नोटरी केलेले हमीपत्र, संस्थेचे बिल्डर प्रमोटर्सनी रु. १०० च्या स्टँप पेपरवर नोटरी केलेले हमीपत्र, सभासदांचे हमीपत्र, भाडेकरू मालकी हक्क गृहनिर्माण संस्था नोंदणीकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे सक्षम अधिकारी यांची जागा कोणत्या क्षेत्रात येते, याबाबतचा झोनदाखला, लेआऊट प्लॅन, संस्था नोंदणीसाठी कमीतकमी दहा सभासद आवश्यक असतात. इतर गृहनिर्माण संस्था-गृहतारण संस्था, या प्रकारात संस्था नोंदणी बाबतचा अर्ज, संस्थेची माहिती तक्ता सभासदांची माहिती तक्ता, सभासदांचे हिशोब पत्रक इत्यादी कागदपत्रे महत्त्वाची समजली जातात.
आपल्या गृहनिर्माण संस्थेविषयी सभासदांना प्रेम असणे गरजेचे आहे. त्यासाठी सभासदांनी जागृत राहून वेळोवेळी संस्थेची अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे त्यांचे कर्तव्य ठरते. अधिक माहितीसाठी निबंधकाचा/वकिलाचा सल्ला मोलाचा ठरेल.
*दयानंद नेने*
Comments
Post a Comment