“महारेरा” मुळे बांधकाम क्षेत्रात शिस्त आणि पारदर्शकता - मुख्यमंत्री फडणवीस
प्रॉपर्टी एक्स्पोचे उदघाटन
“महारेरा” मुळे बांधकाम क्षेत्रात शिस्त आणि पारदर्शकता
- मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. 17 : शासनाने लागू केलेल्या महारेरा कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रात शिस्त आणि पारदर्शकता निर्माण झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
एम.एम.आर.डी.ए.च्या मैदानावर आयोजित क्रेडाई एमसिएचआय प्रॉपर्टी एक्स्पोच्या उदघाटन प्रसंगी ते आज बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, प्रत्येकाचे घराचे स्वप्न असते. घर म्हणजे लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. येथील प्रदर्शन पाहिल्यावर प्रत्येकाला घर घ्यावेसे वाटेल. या ठिकाणी घराच्या संदर्भातील सर्व माहिती उपलब्ध असून बँकाचे प्रतिनिधी आहेत. ज्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला, अशा सर्व प्रकल्पांची नोंदणी महारेरा अंतर्गत झालेली आहे. जीएसटी आणि महारेरा लागू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्रात निर्माण झालेले प्रश्न, त्याचबरोबर मजूर आणि कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सोबत आहे. शासनाचे धोरण बांधकाम व्यावसायिकांना मदत करण्याचे आहे. जवळपास 14 हजार विकासकांनी आणि 10 हजार रियल इस्टेट एजंटांनी महारेराची नोंदणी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करुन भव्यदिव्य प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संस्थेने उभारलेले हे 28 वे प्रदर्शन असून येथे जवळपास 115 स्टॉल आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, पनवेल येथील विकासकांनी आपले प्रकल्प सादर केले आहेत. पन्नास वित्तीय संस्था त्यांच्या मदतीला आहेत. हे गृह प्रकल्पाचे प्रदर्शन आजपासून तीन दिवस सुरू राहणार आहे.
प्रारंभी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दीप प्रज्वलन करुन या प्रदर्शनाचे उदघाटन केले. त्यानंतर काही स्टॉलची पाहणी करुन विकासकांशी संवाद साधला. क्रेडाईचे अध्यक्ष मयुर शहा यांनी प्रास्ताविकातून प्रदर्शन आयोजनाची माहिती दिली. शेवटी क्रेडाईचे सचिव डोमनिक रोमेल यांनी आभार मानले. यावेळी बांधकाम क्षेत्रातील अनेकजण उपस्थित होते.
Comments
Post a Comment